खासदाराने मारली महिला लोकप्रतिनिधीच्या मुस्काटात

केनियाची संसद Image copyright Reuters
प्रतिमा मथळा केनियाची संसद

केनियामध्ये एका खासदाराने आपल्या सहकारी महिला खासदाराच्या थोबाडीत मारल्याची घटना घडली आहे.

मुस्काटात मारणाऱ्या पुरुष खासदाराचं नाव रशीद कासिम असं आहे आणि ज्या महिलेवर त्यांनी हल्ला केल्या त्या महिला खासदाराचं नाव फातुमा गेडी असं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रशीद यांनी फातुमा यांच्या थोबाडीत मारली कारण त्यांनी रशीद यांच्या मतदारसंघासाठी निधी दिला नाही.

या कथित हल्ल्यानंतर काढलेला फातुमा गेडी यांचा फोटो व्हायरल झाला असून ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शोअर केला जातोय. या फोटोमध्ये फातुमा रडत आहेत आणि त्यांच्या ओठातून रक्त येत आहे.

या घटनेनंतर महिला खासदारांनी केनियाच्या संसदेतून वॉकआऊट केला कारण पुरुष खासदार महिला खासदारांची चेष्टा करत होते.

दुसऱ्या महिला खासदार सबीना वान्जिरू चेग यांनी बीबीसीला सांगितलं की या सगळ्या प्रकरणात पुरुष खासदारांनी महिला खासदारांची थट्टा केली. म्हणून चिडून महिला खासदारांनी वॉकआऊट केला.

सबीना म्हणाल्या, "काही पुरुष सहकारी आमच्यावर हसायला लागले. आम्हाला म्हणाले आज 'थोबाडीत मारण्याचा' दिवस आहे. ते असंही म्हणाले की महिलांनी नम्रपणे वागायला हवं आणि त्यांना कळायलं हवं की पुरुषांसोबत कसं वागायचं."

आम्हीही खासदार आहोत आणि आमच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही आहोत, असंही सबिना पुढे म्हणाल्या.

त्यांनी रशीद कासिम यांच्या अटकेची मागणीही केली. यानंतर राशिद यांना ताब्यात घेतलं गेलं.

आरोपी रशीद कासिम यांना अटक झाल्याचं वृत्त आहे.

या घटनेनतंर केनियाच्या सोशल मीडियावर राशिद यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसंच #ArrestHonkassim आणि #JusticeForFatumaGed हा हॅशटॅग वापरुन मोठ्या प्रमाणात ट्वीट केले जात आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)