क्रिकेट वर्ल्ड कपसाठी इंग्लंडची निवड केलीच कशी? संतप्त चाहत्यांचा सवाल

लॉर्ड्स स्टेडियम Image copyright Getty Images

वर्ल्ड कपला सुरुवात झालीय आणि माहोल क्रिकेटमय झालाय. पण खरंच सगळीकडे असा माहोल आहे का? की वर्ल्ड कप आता इतर कोणत्याही क्रिकेट टूर्नामेंटसारखा वाटायला लागलाय?

ट्रेंट ब्रिज स्टेडियमच्या गेटपाशी आल्याबरोबर मला इंडिया...इंडियाचा गजर ऐकू येऊ लागला. खरंतर पिचची तपासणी सुरू होती आणि मॅच अजून सुरू झालेली नव्हती.

पण स्टेडियममध्ये जायला मी अधीर झालो होतो. पण भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅच पावसामुळे रद्द करण्यात येत असल्याचं आयसीसीने जाहीर केलं आणि माझ्या उत्साहावरही पाणी पडलं. मी पुरता आतही शिरलो नव्हतो तितक्यात गेट्स उघडली नाराज झालेल्या भारतीय पाठीराख्यांच्या झुंडी आरडाओरडा करत बाहेर पडू लागल्या.

सगळं संपलं होतं. दोन्ही टीमला प्रत्येकी एक पॉईंट देण्यात आला होता. वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेटची जगातली सगळ्यांत मोठी स्पर्धा आणि पावसामुळे रद्द करण्यात आलेली ही चौथी मॅच.

सकाळी 9:20च्या सुमारास माझं विमान लंडनच्या धावपट्टीवर उतरलं आणि माझा वर्ल्ड कपचा हा खास प्रवास सुरू झाला. वर्ल्ड कपची मॅच प्रत्यक्ष स्टेडियममध्ये हजर राहून पाहणं हे प्रत्येक क्रिकेटप्रेमीचं स्वप्न असतं आणि हेच स्वप्न भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अगदी अमेरिकेतूनही क्रिकेट प्रेमींना ओढून इंग्लंडमध्ये घेऊन आलेलं आहे. पण असं असूनही आयोजक इंग्लंडने मात्र काही प्रमाणात निराशा केलीय.

कारण -बेभरवशाचं हवामान आणि वर्ल्ड कपच्या मोठ्या प्रसिद्धीचा अभाव.

इंग्लंडच का? ही योग्य वेळ आहे का?

ज्या देशामध्ये एखाद्या खेळाचा उगम झाला आणि काही ऐतिहासिक घटना जिथे घटल्या, त्या देशात जाणं हा अनुभव नेहमीच संस्मरणीय असतो. मी या वर्ल्ड कपच्या कव्हरेजसाठीची तयारी आणि आखणी करत असताना लंडनमधला माझा सहकारी म्हणाला, ''काळजी करू नकोस, या 'इंग्लिश समर'चा सगळेजण आनंद घेतील.''

पण मी आणि माझ्यासारख्याच जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या इतर अनेकांसाठी कोणीतरी काही वेगळंच योजून ठेवलं होतं.

Image copyright Getty Images

इंग्लंडच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या पावसामुळे अनेकांची चिंता व्यक्त केली होती. सगळ्यांत चर्चा होतेय ती - रिझर्व्ह डेज म्हणजे राखून ठेवण्यात आलेल्या काही दिवसांबद्दल. या फॉरमॅटमध्ये सामने खेळवताना आयसीसीने जास्तीचे काही दिवस राखून ठेवलेले नाहीत. आणि याचा परिणाम टीम्सना मिळणाऱ्या पॉइंट्सवर होतोय. दुबईहून आलेले काही फॅन्स मला ट्रेंट ब्रिजच्या बाहेर भेटले.

कट्टर क्रिकेटप्रेमी असणारा कुमार दुबईत काम करतो आणि आपल्या मुलांना हा शानदार खेळ दाखवण्यासाठी लंडनला घेऊन आलाय. ''हवामान इतकं बेभरवशाचं असणार असल्याचं आयसीसीला माहीत असतानाही त्यांनी सामने खेळवण्यासाठी इंग्लंडची निवडच कशी केली? हा मोसम योग्य होता का? वर्ल्ड कप जर दुसरीकडे कुठे खेळवण्यात आला असता तर त्याचा जास्त आनंद घेता आला असता, नाही का?'' तो विचारतो.

आयसीसीला आता तातडीने या मुद्द्याचा विचार करावा लागेल. वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 4 सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहेत आणि हवामान असंच बेभरवशाचं राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आतापर्यंत श्रीलंकेला याचा सगळ्यांत जास्त फटका बसलाय. त्यांचे 2 सामने रद्द झालेले आहेत. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, बांगलादेश, न्यूझीलंड आणि आता भारतालाही याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

''या वर्ल्ड कपमध्ये 11 टीम्स आहेत 10 देश आणि 1 वरुणराजा'' कॅनडाहून मित्रांसोबत आलेला दलजीत म्हणतो. सोशल मीडियावरही अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया पहायला मिळतायत.

आघाडीची चुरस

या वर्ल्डकप मधल्या टीम्सच्या गुणतालिकेवर अशा वाहून गेलेल्या मॅचेसमुळे परिणाम होणार आहे आणि याची काळजी फक्त फॅन्स नाही तर खेळाडूंनाही वाटतेय. पाऊस पडल्याने जर संघाचा एक पॉइंट जातो. परिणामी या तक्त्यामध्ये वर जाण्याची त्यांची संधी निसटते. काहीही झालं तरी फक्त 4 टीम या सेमी फायनलमध्ये जाणार आहे.

Image copyright Getty Images

''शेवटी सगळं आकडेवारीवरच येणार आहे. एखादा संघ चांगला आहे वा नाही, याने फरक पडणार नाही. तुमच्याजवळ गुण नसतील तर तुम्ही बाद होणार.'' लंडनमधल्या रेस्तराँमध्ये काम करणारी कनिका लांबा सांगते.

मला आज भेटलेल्या सगळ्या फॅन्सपैकी ती सगळ्यात जास्त नाराज वाटली. ''माझे वडील क्रिकेटवेडे आहेत. मला आणि माझ्या बहिणीला हा खेळ खेळायला आणि या खेळावर प्रेम करायला त्यांनीच शिकवलं. मला भारताच्या सामन्यांचा आनंद लुटायचाय. पण यावेळी माझं हे स्वप्न पूर्ण होईल, असं वाटत नाही,'' ती म्हणते.

प्रसिद्धी मोहिमेचा अभाव

विमान प्रवासात असताना मला असं वाटलं होतं की सारं लंडन सजलेलं असेल. आणि का असू नये? क्रिकेट वर्ल्ड कप होतोय. पण एखाद-दोन बॅनर्स आणि तुरळक जाहिराती इतकंच काय ते नजरेस पडलं. कदाचित मी भारतीय असल्यामुळे माझ्या अपेक्षा वाढलेल्या असाव्यात.

भारताने जेव्हा 2011च्या वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवलं होतं, तेव्हाचा माहोल मला आठवतोय. सगळीकडे क्रिकेटचं वेड पसरलं होतं. मला वाटतं याच वेडावर स्वार होत भारतीय टीमने तो वर्ल्ड कप जिंकला. पण इंग्लंडमध्ये सारं काही थंड आहे. लंडनसारखंच नॉटिंगहममध्येही कसल्याच खाणाखुणा नव्हत्या. अगदी ज्या ट्रेंट ब्रिज स्टेडियममध्ये वर्ल्ड कपचा हा सामना होत होता तिथेही कसलीच लक्षणं नव्हती.

आज सकाळी हिथ्रो विमानतळावरून नॉटिंगहमला जाण्यासाठी मी टॅक्सी केली. 173 किलोमीटर्सचं हे अंतर मी ताहिर इम्रानच्या टॅक्सीतून पार केलं. चाळीशीतला ताहिर पाकिस्तानातल्या वझीराबाद जिल्ह्यातला आहे. संपूर्ण प्रवासात आमच्या क्रिकेट, भारत आणि पाकिस्तान याबद्दल गप्पा झाल्या.

गेल्या 20 वर्षांपासून ताहिर लंडनमध्ये स्थायिक आहे. त्याने एक वेगळीच गोष्ट सांगितली. तो म्हणाला, ''क्रिकेटचा जन्म इथे इंग्लंडमध्ये झाला पण आता मात्र इथल्या लोकांना हा खेळ तितका आवडत नाही किंवा ते फारसं क्रिकेट खेळतही नाहीत. ''

इथल्या तरूण पिढीला फुटबॉल मध्ये जास्त रस असल्याचं तो सांगतो. कदाचित म्हणूनच 3 जूनला बहुतेकजण हे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच न पाहता लिव्हरपूल विरुद्ध टॉटनहॅम हॉटस्पर मॅच बघण्यात गुंगलेले होते. ''जागतिक रँकिगमध्ये पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या टीमचा पाकिस्तानने परभाव केला, पण कोणालाही त्यात स्वारस्य नव्हतं. ''

मी ही डायरी लिहीत असतानाच, तापमान 13वरून घसरून 11 डिग्रीवर गेलंय. आजूबाजूचं वातावरण थंड होत असताना, वर्ल्ड कपवरून सुरू असलेला हा वाद मात्र तापत चाललाय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)