देवेंद्र फडणवीस: कोकणात समुद्राला मिळणारे नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवणार #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस Image copyright Twitter/Devendra Fadnavis

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. कोकणातून समुद्राला मिळणारे पाणी मराठवाड्यात वळवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला असल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

तसंच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलताना त्यांनी हे सांगितलं.

राज्य शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याला जलपरिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांत केला असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, गेल्या तीन चार वर्षांत कमी पावसामुळे काही भागात दुष्काळाचे संकट अनुभवले आहे. त्यावर मात करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल.

तसंच वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारं पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत ४८० किमीचा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा प्रयत्न आहे.

2. मुकेश अंबानींनी दोन दिवसांत कमावले 29 हजार कोटी

जियो फायबरमुळे रिलायन्स उद्योगसमूहाला घसघशीत फायका झाला असून मुकेश अंबानी यांना दोन दिवसांत 29 हजार कोटी रुपयांचा फायदा झाल्याची बातमी इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे. एकीकडे शेअर बाजारात घसरण होत असली तरी रिलायन्सच्या शेअरचा भाव वधारल्यानं मुकेश अंबानींना हा फायदा झाला आहे.

Image copyright Getty Images

सोमवारी झालेल्या रिलायन्स उद्योगाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तीन महत्वाच्या घोषणा अंबानी यांनी केल्या. जिओ फायबर लाँच करणे, सौदी ऑईल कंपनी 'अरामको'ला 20 टक्के शेअर्स विकणे आणि 18 महिन्यांत रिलायन्सला कर्जमुक्त करणे या तीन घोषणांनंतर शेअरबाजारात रिलायन्सचा भाव वधारला. रिलायन्सचा शेअर दोन दिवसांत 1162 रुपयांवरुन 1288 रुपयांवर पोहचला. यामुळेच 29 हजार कोटींची कमाई मुकेश अंबानींना करता आली आहे.

3. दिल्लीत महिलांना दिवाळीपासून मोफत सिटी बस प्रवास

दिल्ली ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशनच्या बसमध्ये येत्या 29 ऑक्टोबरपासूनअशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल केली. दिल्ली मेट्रोवरही महिलांना नि:शुल्क प्रवास उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर काम सुरू आहे, अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.

रक्षाबंधनांच्या दिवशी केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. या घोषणेची अंमलबजावणी भाऊबीजेपासून होणार आहे. दिल्लीतल्या भगिनींसाठी ही अनोखी भेट ठरेल असं केजरीवाल यांनी म्हटलं. ही बातमी न्यूज 18 ने दिली.

4. न्यायपालिकेत 'अनुचित' कृत्यांमध्ये अभूतपूर्व वाढ

न्यायपालिकेत 'अनुचित' कृत्यांच्या घटनांमध्ये अभूतपूर्व वाढ झाल्याची खंत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली. न्यायालयात गैरवर्तनाचे प्रकार घडत आहेत. न्यायालयाची प्रतिष्ठा जपण्यासाठी यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टात स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

Image copyright I stock

यावेळी कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद देखील होते. न्यायालयीन कामकाजावेळी शिस्त कायम राहावी यासाठी अंतर्गत व्यवस्था असावी असं मत प्रसाद यांनी मांडल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.

5. आठवडाभरात पावसाने मोडला पन्नास वर्षांचा रेकॉर्ड

गेल्या पन्नास वर्षांतील सरासरीच्या तुलनेत या वर्षीच्या ८ ते १४ ऑगस्ट या आठवडाभराच्या काळात देशभराततब्बल ४५ टक्के एवढ्या अधिक पावसाची नोंद झाल्याची आकडेवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केली आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे. महत्वाचा भाग म्हणजे १ जूनपासून सुरू झालेल्या मान्सूनच्या पूर्ण हंगामात मात्र आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत अवघा एक टक्का अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.

८ ते १४ ऑगस्टपर्यंत केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप येथे सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्याखालोखाल महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थानात अधिक पावसाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, त्रिपुरा, मिझोराममध्ये सामान्य पाऊस नोंदविण्यात आला आहे. तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, आसामचा काही भाग, बिहार, हरयाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर राज्यांत उणे म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सांगली, सातारा आणि कोल्हापुरात हलका पाऊस सुरू आहे. आगामी काळात सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्येमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. केवळ हलका पाऊस सुरू राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील इतर भागातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि गोवा येथे मध्यम पावसासह काही जोरदार सरींची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी होण्याचे कारण मान्सूनची दुर्बल झालेली लाट आहे. महाराष्ट्राच्या इतर विभागांतही पावसाचा जोर कमी झाला आहे, अशी माहिती 'स्कायमेट'कडून देण्यात आली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)