सांगली कोल्हापूर: खर्च कमी करून पूरग्रस्तांना मदत करण्याचा गणपती मंडळांचा निर्धार

गणपती Image copyright AFP Contributor/getty

गणेशोत्सव अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर पूर परिस्थिती ओढवल्याने हा सण नेहमीसारखा साजरा न करण्याचा निर्णय गणपती मंडळांनी घेतला आहे. अतिरिक्त खर्च कमी करून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्धार सांगली-कोल्हापूर-मिरज या भागातल्या गणपती मंडळांनी घेतला आहे.

पुराच्या पाण्यात आयुष्यभर कमावलेली साधन संपत्ती वाहून गेली. लोकांचे संसार उघड्यावर आले. जीवाभावाच्या दुभत्या जनावरांचा करुण अंत झाला. काहींनी तर आपल्या आप्तांना ही गमावलं. आता गरज आहे या सगळ्यांना पुन्हा उभं करायची त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तरुण मंडळांनी गणपती उत्सव साध्या पद्धतीने करण्याचं ठरवलं आहे.

शहरातील राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळाचे हे 50वे वर्षं आहे. इथलं सर्वांत जुनं मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. दरवर्षी या मंडळाचे देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात.

मंडळाने दोन महिन्यापूर्वीच देखाव्याची तयारी केली होती. तो तयार देखील झाला पण आता तो देखावा न उभारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या देखाव्यासाठी साडे पाच लाख रूपये खर्च झाला होता. पुरामुळे हे सगळं रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे मंडळाचे दुर्गेश लिंग्रस यांनी सांगितलं.

ते सांगतात यावर्षी केवळ गणपती पूजा आणि आरती करून सण साजरा केला जाईल. कोणताही थाटमाट करण्यात येणार नाही. वर्गणी गोळा केली जाणार नाही. मंडळाकडे शिल्लक रक्कम पुरग्रस्तांसाठी दिली जाणार आहे. त्या पैशातून लोकांना गरजेच्या वस्तू पुरवल्या जातील.

2005 मध्ये आलेल्या पूरपरिस्थिती मध्ये देखील या मंडळातर्फे पूरग्रस्तांना मदत केली गेली होती. शिरोळ, सैनिक टाकळी परिसरात गावे दत्तक घेत तिथली कपडे आणि जेवणाची व्यवस्था या मंडळाने केली होती.

मिरजेत गणेश स्वागतकमानी रद्द: निधी पूरग्रस्तांना देणार

सांगली जिल्ह्यातही पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना बळ देण्यासोबतच आर्थिक मदत करणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यामुळं सामाजिक भान जपून अखिल भारतीय मराठा महासंघासह सर्वांनी यंदा गणेशोत्सवामध्ये स्वागत कमान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या 45 वर्षांपासून मिरज शहरात गणपती उत्सव दरम्यान मराठा महासंघाची कमान उभारली जाते. साडे तीन ते चार लाख रुपये खर्चून ही कमान उभारली जाते. यावर्षी आलेल्या पूरपरिस्थितीत गरजूंना मदत करण्याच्या हेतूने मराठा महासंघाने कमान उभारणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत मराठा महासंघाचे नेताजी मामा सूर्यवंशी यांनी सांगितले की, 'यावर्षी आम्ही कमान उभी करणार नाही. पण कमानीसाठी होणारा खर्च टाळून तेच पैसे पूरग्रस्तांसाठी वापरणार आहोत. याआधी 10 वर्षांपूर्वी कोरडा दुष्काळ पडला होता त्यावेळी देखील मराठा महासंघाने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत कमान रद्द करून तो पैसा जनावरांच्या चाऱ्यासाठी दिला होता. सध्याच्या पूर परिस्थितीत मराठा महासंघाकडून जनावरांचा सांभाळ केला जातो आहे'.

प्रतिमा मथळा गेल्या वर्षी मिरजमध्ये अशी कमान उभारण्यात आली होती.

मिरज शहरातील हिंदू एकता, संभाजी महाराज अशा एकूण 19 मंडळांनी कमान उभी न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मिरज इथे आदर्श मंडळात या सगळ्यांची बैठक झाली.

याबाबत शिवसेनेचे पप्पू शिंदे सांगतात, 'मिरज शहरात स्वागत कमान उभी करण्याची परंपरा अनेक वर्षाची आहे. दरवर्षी कमानीच्या माध्यमातून एक वेगळा दृष्टिकोन जपण्यात आला आहे. पण यावर्षी आलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कमानी रद्द करण्याचा निर्णय घेतला. कमानीच्या खर्चाची रक्कम पुरग्रस्तांसाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमानीवर होणारा खर्च पूरग्रस्तांना लागणाऱ्या धान्य कपडे अशा वस्तूसाठी दिला जाणार आहे'.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)