स्वातंत्र्यदिन: नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे 9 मुद्दे

स्वातंत्र्यदिनीच्या निमित्तीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. 'लोकसंख्या विस्फोट ही भयंकर समस्या बनू शकते. देशात काही लोकांना ही जाणीव आहे की छोटं कुटुंब असेल तर ते सुखी राहू शकतं,' असं मोदी म्हणाले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार दुसऱ्यांदा निवडून सत्तेत आल्यानंतरचा हा पहिला स्वातंत्र्य दिन असल्यामुळे पंतप्रधान काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. लाल किल्ल्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीला भेट देऊन आदरांजली वाहिली.

गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री यावेळी उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 9 मुद्दे

1. लोकसंख्या

लोकसंख्या विस्फोटामुळे अनेक संकटं तयार होऊ शकतील. समाजात एक वर्ग असा आहे जो मुलांच्या भवितव्याची काळजी करतो. त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत की नाही याचा विचार करतो. असे लोक सत्कारास पात्र आहेत. लोकसंख्येच्या प्रश्नाकडे मोदींनी लक्ष वेधलं. जे कुटुंब छोटं असतं ते सुखी असतं असं मोदी म्हणाले.

2. कलम 370

नवं सरकार येऊन 10 आठवडेही झाले नाहीत पण आम्ही 370 कलम हटवलं, कलम 370 हटवण्याचं जे काम गेल्या 70 वर्षांत झालं नाही, ते नवीन सरकार बनल्यानंतर 70 दिवसांच्या आत झालं. हे काम करावं असं सर्वांना वाटत होतं पण कुणी करावं हा प्रश्न होता. तेच आम्ही केलं. कलम 370 रद्द झाल्याने या देशात आला एकच राज्यघटना अस्तित्वात राहील असं ते म्हणाले.

3. जल जीवन मिशनची घोषणा

आजच्या भाषणात मोदींनी जल जीवन मिशनची घोषणा केली. या योजनेसाठी साडे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच सरकारचा संकल्प असल्याचं त्यांनी म्हटलं. सर्वांना शुद्ध पेय जल मिळण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. पाण्याच्या क्षेत्रात खूप काम करणं आवश्यक आहे. पाणी समाप्त झालं तर जीवन समाप्त होतं हे संत तिरुवल्लूवर यांचं वचन सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. असं मोदी म्हणाले. सिंचन क्षेत्रात पायाभूत सुविधांवर भर देण्यात येईल असं ते म्हणाले.

4. एक देश, एक निवडणूक

'एक देश, एक निवडणूक' यावर सर्वांनी विचार करायला हवा. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात यावर सर्वांनी मिळून विचार करणं आवश्यक आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मोदींची हीच भूमिका आहेत. त्याचाच पुनर्उच्चार आज मोदींनी केला.

5. शेतकरी

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत 90,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत. आपला शेतकरी हा अन्नदाता आहे त्याने ऊर्जादाता व्हावं. जास्तीत जास्त कृषी उत्पादनांची निर्यात झाल्यावर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढू शकतं. तसेच शेतकऱ्याने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढं यावं असं मोदी म्हणाले. रासायनिक खतांचा वापर करू असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो. रासायनिक खतांमुळे शेतीचं आणि पर्यावरणाचं नुकसान होतं सेंद्रीय खताचा वापर करावा असं मोदी म्हणाले.

6. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ

आजच्या भाषणात मोदींनी 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' हे पद निर्माण करण्यात येईल अशी घोषणा केली. वायूसेना, लष्कर आणि नौदलाचा एक प्रमुख करण्यात येईल. तिन्ही दलांत समन्वय राहण्यासाठी या तिन्ही दलांचा एक प्रमुख असावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत होती, त्यामुळे चीफ ऑफ डिफेन्सचं पद निर्माण करण्यात येईल असं मोदी म्हणाले.

7. तिहेरी तलाक

मुस्लीम महिलांच्या डोक्यावर सतत तिहेरी तलाकची टांगती तलवार होती. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण आम्ही घेतला. ज्या प्रमाणे या देशाने सतीप्रथा नष्ट केली, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा कायदा आणला त्याचप्रमाणे मुस्लीम महिलांच्या कल्याणासाठी हा कायदा आणणं आवश्यक होतं असं मोदी म्हणाले.

8 . अर्थव्यवस्था

2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे असं मोदी म्हणाले. हे आव्हान मोठं आहे याची मला जाणीव आहे पण आव्हान हे खडतर आहे म्हणूनच ते पूर्ण करण्याची जिद्द आपण उराशी बाळगली पाहिजे असं मोदी म्हणाले. गरीब श्रीमंतांनी सर्वांनी हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असं ते म्हणाले. श्रीमंतांचा देखील सन्मान होणं आवश्यक आहे, जर संपत्ती निर्माण झाली तरच संपत्तीचं वाटप होईल असं ते यावेळी म्हणाले.

9. दहशतवादाचा सामना

दहशतवादाचा सामना करण्याची आवश्यकता असल्याचं मोदी यांनी सांगितलं. काही देश दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला पोसत आहेत त्यांच्याविरुद्ध दंड थोपटून उभं राहायला हवं असं मोदी यांनी सांगितलं.

हे वाचलं का?