AN-32 विमान अपघात : 'माझा मुलगा खूप हुशार होता, पण नशिबानं साथ दिली नाही'

एन32 मोहित गर्ग

3 जूनला भारतीय वायुसेनेचं AN-32 विमान बेपत्ता झालं होतं. या विमानातील 13 सदस्यांच्या मृत्यू झाल्याचं भारतीय वायुसेनेनं स्पष्ट केलं आहे. पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील छोटेस गाव समाणामधले मोहित गर्ग या विमानात प्रवास करत होते.

मोहित गर्ग हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातले आहेत. त्यांचं घर अग्रेसन मोहल्ल्यातल्या मुख्य भागात आहे. आम्ही मोहित यांच्या घरी पोहोचलो, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांप्रति सांत्वन व्यक्त करण्यासाठी तिथं नातेवाईक जमले होते.

घराबाहेर शोकमग्न व्यक्तींमध्ये मोहित यांचे वडील सुरेंद्रपाल बसलेले होते.

घटनेची माहिती मिळताच ते 8 जूनला आसामला गेले होते. शुक्रवारी सकाळी ते आसामहून परतले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे दिसत होता.

AN-32 विमान बेपत्ता झाल्याची बातमी त्यांना टीव्हीवर समजली होती.

ते सांगतात, "आसामध्ये एक विमान बेपत्ता झालं आहे, असं माझ्या एका मित्रानं सांगितलं. माझा मुलगा तिथंच तैनात आहे, हे मला माहिती होतं. 3 वाजले असतील तेव्हा, मी लगेच माझ्या सुनेला फोन केला. मोहित त्या विमानात आहे, हे तिलासुद्धा माहिती नव्हतं.

"तिनं वायुसेनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तेव्हा तिला ही गोष्ट समजली. मी माझ्या भावाला सोबत घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं पोहोचलो. तिथल्या अधिकाऱ्यांनी आमची खूप काळजी घेतली आणि विमानाला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. "

'नशिबानं धोका दिला'

"मला वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एका चुकीमुळे ते दुसऱ्या दरीत पोहोचले. त्यावेळी विमान 8 हजार फूट उंचीवर होतं. ते परत येऊ शकत नव्हतं. त्यांनी विमानाला वरती उडवायचा प्रयत्न केला आणि विमान साडे बारा हजार फूट उंचीवर घेऊन गेले. 20 सेंकद अजून मिळाले असते, तर त्यांनी पर्वत पार केलं असतं. पण, ते शेवटचं 250 फुट अंतर पार करू शकलं नाही. माझा मुलगा खूप हुशार होता, विमान वाचलं असतं, पण नशिबानं धोका दिला," मोहितचे वडील सांगतात.

सुरेंद्र हे सांगत होते, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांच्याजवळील एक व्यक्ती त्यांना आधार देत होती.

थोडंस थांबल्यानंतर ते पुढे सांगायला सुरुवात करतात, "माझा मुलगा हिमतीचा होता. स्वत:च्या कष्टानं तो वायुसेनेत भरती झाला होता. तोच माझं नशीब होता. फक्त माझाच नाही, तो संपूर्ण देशाचा मुलगा होता आणि त्यानं देशासाठी जीव दिलाय."

हे सांगता सांगता त्यांचा गळा दाटून येतो, पूर्ण ताकद लावून ते बोलत आहेत, असं स्पष्टपणे जाणवतं.

प्रतिमा मथळा सुरेंद्र पाल

मोहितच्या आईला हृदयविकाराचा त्रास आहे. या घटनेविषयी त्यांना उशीरानं सांगण्यात आलं.

"मी माझ्या मोठ्या मुलाला फोन करून सांगितलं होतं की, दोन जवळचे नातेवाईक आणि डॉक्टर यांना सोबत घे आणि मोहितला अपघात झाला आहे, हे आईला सांग. आजच (शुक्रवार) त्यांना या घटनेविषयी पूर्ण माहिती दिली आहे. त्या बेडवर पडून आहेत, या घटनेचा त्यांच्यावर कसा परिणाम होईल, सांगता येत नाही," सुरेंद्र सांगतात.

पीपीएस, नाभा स्कूलचे मोहित विद्यार्थी होते. या शाळेतील अनेक विद्यार्थी सैन्यात आणि पोलिसात भरती झाले आहेत. इथे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मोहित यांनी एनडीएची परीक्षा दिली होती, त्यात ते उत्तीर्ण झाले होते. भारतीय वायुसेनेत ते फ्लाईट लेफ्टनंट या पदावर रुजू होते. गेल्या 3 वर्षांपासून ते आसामच्या जोहराटमध्ये तैनात होते.

मोहितचे भाऊ अश्विनी गर्ग फक्त इतकंच म्हणाले, "मी काय बोलावं? माझ्या वडिलांनी सगळं सांगितलं आहे. 8 तारखेला मोहित घरी येणार होता. पण, त्यापूर्वीच अपघाताची बातमी आली."

मोहितच्या घरी आलेल्यांपैकी एक होते डॉ. जितेंद्र देव. ते स्थानिक कॉलेजमध्ये मुख्याध्यापक आहेत.

ते सांगतात, "मी वैयक्तिकपणे मोहितला ओळखत नाही. पण, तो आमच्या शहरातला, समाणाचा राहणार होता, त्यामुळे मी इथं आलो आहे. त्याने देशासाठी जीव दिला आहे, तेव्हा इथपर्यंत येणं कर्तव्यच आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)