राज्यात डीएड प्रवेशासाठी आतापर्यंत केवळ अडीच हजार अर्ज #पाचमोठ्याबातम्या

Image copyright Getty Images

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत :

1) डी. एड. प्रवेशासाठी केवळ अडीच हजार अर्ज

राज्यभरातून आतापर्यंत (13जून) केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. दरवर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डीएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

डीएड प्रवेशासाठी 16 जूनपर्यंत यासाठी प्रवेश अर्ज भरता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रं मिळविण्यास उशीर होत असल्यानं प्रवेश अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी प्रशिक्षण परिषदेकडे करण्यात आली आहे.

17 जूनपर्यंत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. प्रवेश अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी 20 जून रोजी प्रसिध्द केली आहे. तर प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी येत्या 23 जून रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे.

2) पीककर्ज वेळेत मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर सोमवारी बँकांची बैठक घ्यावी - मुख्य सचिव

शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावं यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा, असं मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगण्यात आलं आहे. ABP माझानं ही बातमी दिली आहे.

तसंच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती 30 जूनपर्यंत केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी, असंही त्यांनी सांगितलं.

या योजनेच्या निकषात बदल केल्यानं राज्यातल्या 1 कोटी 20 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

3) राज्यातल्या निवासी डॉक्टरांचा एक दिवसीय बंद

कोलकत्ता येथील डॉक्टरांच्या अमानुष हल्ल्याविरोधात आज (14 जून) राज्यातले निवासी डॉक्टर एका दिवसाचा बंद पाळणार असल्याचं MARD संघटनेनं सांगितलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्रात सरकारी आणि बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात येईल. तर आपत्कालीन सेवा मात्र चालू ठेवण्यात येईल, अशी माहिती MARDच्या अध्यक्ष्य डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

Image copyright Getty Images

पश्चिम बंगालमधल्या डॉक्टरांना सुरक्षा द्या, हल्ल्यातल्या आरोपींना कडक शिक्षा द्या, अशी MARDनं मागणी केली आहे.

4) नायर रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला

मुंबईतल्या नायर रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक सातमधून एका महिलेनं पाच दिवसाचं मूल पळवल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

याप्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायर रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी सात नंबर वॉर्डमध्ये व्यवस्था करण्यात येते.

या ठिकाणी एक महिला पाच दिवसांच्या बाळासह झोपली होती. काही वेळाने जाग आली त्यावेळी मूल शेजारी नव्हते. तिने आजूबाजूला शोध घेतला, रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनीही शोधले मात्र मूल सापडले नाही.

शेवटी मुलाच्या आईसह रुग्णालय प्रशासनानं पोलिसांत तक्रार दाखल केली.

5) भारत अवकाशात स्वत:चं स्पेस स्टेशन बनवणार

भारत अवकाशात स्वतःचे स्पेस स्टेशन निर्माण करण्याची योजना आखत असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे. लोकसत्तानं बातमी दिली आहे. नुकतंच इस्रो पुन्हा चंद्रावर आपलं यान पाठवणार असल्याची घोषणा केली आहे.

स्पेस स्टेशन हा 'गगनयान' मोहिमेचा पुढील भाग असेल असेही डॉ. सिवन यांनी स्पष्ट केलं आहे.

अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेनंतरही आपल्याला 'गगनयान' कार्यक्रम टिकवून ठेवायचा आहे. त्यासाठीच भारत अवकाशात स्वतःचे अंतराळस्थानक निर्माण करण्याची तयारी करीत असल्याचे डॉ. सिवन यांनी गुरुवारी (13 जून) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)