AN-32 विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व 13 लष्करी जवानांचा मृत्यू

13 सैन्यकर्मियों की मौत Image copyright ANI

भारतीय वायु सेनेनं सांगितलं आहे की ,दुर्घटना झालेल्या AN-32 विमानातल्या सर्व 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 3 जून रोजी आसाममधल्या जोरहाटमधून उड्डाण केल्यानंतर हे विमान रडारवरून बेपत्ता झालं होतं.

3 जूनपासूनच या विमानाचा शोध घेण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू होते. 11 जून रोजी अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यात विमानाचे अवशेष सापडले. विमानाचे अवशेष सापडले त्या दिवशी वायूदलाने सांगितलं होतं की, विमानातल्या कर्मचाऱ्यांविषयी काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र, 13 जून रोजी सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

भारतीय हवाई दलाने म्हटलं आहे, "हे सांगताना आम्हाला अत्यंत खेद होत आहे की AN-32 विमानात असलेल्या 13 कर्मचाऱ्यांपैकी कुणीही जिवंत नाही. आम्ही सर्व बहादुर सैन्य कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो."

मृत पावलेल्यांमध्ये भारतीय वायु सेनेचे विंग कमांडर जीएम चार्ल्स, स्क्वॉडर्न लीडर एच विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर. थापा, आशिष तंवर, एस. मोहंती, मोहित के. गर्ग, वॉरंट ऑफिसर के.के. मिश्रा, सार्जेन्ट अनुप कुमार, कोर्पोरेल शेरिन, एयर क्राफ्टमॅन एस.के. सिंह आणि पंकज के. यांच्याशिवाय इतर दोन जवान पुताली आणि राजेश कुमार यांचा समावेश आहे.

सोमवारी 3 जून रोजी दुपारी 12.27 वाजता आसाममधल्या जोरहाट विमानतळावरून भारतीय वायुदलाच्या AN-32 या मालवाहू विमानाने झेप घेतली. पण दुपारी 1 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि तेव्हापासून या विमानाचा आणि त्यात असलेल्या हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा कुणालाच पत्ता नव्हता.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोदेखील जोरहाट आणि अरुणाचल प्रदेशच्या मेचुका या भागात बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेते होते. त्याशिवाय सुखोई 30 MKI, MI17, चिता आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर, तसंच C130J सारखी लढाऊ विमानं आणि AN32चं एक मोठं पथक शोधमोहिमेच्या कामी लागलं होतं.

अशी सुरू होती शोध मोहीम

AN-32 विमानं भारतीय वायुदलाच्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज उड्डाण क्षमतेचा कणा आहेत. हे विमान बेपत्ता झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, संबंधित लोकांना त्यात काहीच आश्चर्य वाटलं नव्हतं.

AN32च्या तीन हजार तास उड्डाणाचा अनुभव असणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याने बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांना सांगितलं होतं, "या संपूर्ण प्रदेशात आकाशातून केवळ नद्याच दिसतात. उर्वरित भाग जंगलाने झाकलेला आहे. AN32 खूप मोठं असू शकतो. मात्र, त्याबद्दल केवळ अंदाजच बांधता येतो."

AN32 चा शोध घेणाऱ्या C130J, नौदलाची P8I, सुखोई, यासारखी विमानं अहोरात्र डेटा गोळा करत होती.

Image copyright Reuters

विमान कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणावरून इन्फ्रारेड आणि लोकेटर ट्रान्समीटरच्या संकेतांना पकडण्याचा प्रयत्न तज्ज्ञ मंडळी करत होती.

फोटो आणि तांत्रिक सिंग्नलच्या आधारावर काही विशिष्ट ठिकाणी हेलिकॉप्टर कमी उंचीवरून उडवली जात होती.

मात्र, यातून केवळ हवेतून जमिनीवरच्या पथकाशी ताळमेळ बसवण्यातच यश आलं होतं.

एका माजी अधिकाऱ्याने सांगितलं होतं, "सर्वात शेवटी विमान ज्या ठिकाणी होतं तिथूनच आमची शोधमोहीम सुरू होते. त्यानंतर शोधमोहिमेचा परिघ वाढतो."

भारतीय हवाई दलासाठी AN32 केवळ एक विमान नव्हतं. ते एक असं विमान होतं जे खास हवाई दलासाठी बनवण्यात आलं होतं.

हवाई दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ कर्मचाऱ्यापर्यंत सर्वच या विमानाला अत्यंत बलशाली, हवाई दलाच्या मालवाहतुकीसाठीचा कणा आणि इतकं मजबूत असल्याचं सांगतात की ते छोट्या आणि तात्पुरत्या धावपट्टीवरदेखील उतरू शकतं. या विमानाच्या देखभालीवरही बराच खर्च होतो.

एक निवृत्त अधिकारी सांगतात, "आमच्याकडे जवळपास 100 AN32 विमानं आहेत. ही विमानं आम्ही 1984 मध्ये सोव्हिएत युनियनकडून खरेदी केली होती. काही अपघात झाले आहेत. मात्र, या अपघातांची तुलना विमानाच्या व्यापक वापराशी केल्यास विमान वापराचं पारडं जड दिसतं."

AN32 मध्ये बिघाड असल्याचा अंदाज होता

22 जुलै 2016 सालीदेखील एक AN32 विमान बेपत्ता झालं होतं. त्यात 29 कर्मचारी होते. त्यावेळी ते विमान पोर्ट ब्लेअर आणि चेन्नईजवळच्या तांबराम यांच्यादरम्यान उड्डाण करत होतं. त्याचा अजूनही शोध लागलेला नाही.

त्यावेळी विमान कोसळण्याचं संभाव्य ठिकाण किंवा सॅटेलाईट नेव्हिगेशनच्या मदतीने विमानाचा शोध घेता येईल, असं पाण्याच्या आत काम करणारं लोकेटर किंवा ऑटोमॅटिक डिपेंडंट सर्विलंस ब्रॉडकास्ट विमानात नव्हतं.

हवाई दलाचं म्हणणं आहे की सध्याच्या AN32मध्ये जुनं इमरजंसी लोकेटर ट्रान्समिटर (ELT) आहे, जे अपघात किंवा आणीबाणीच्या वेळी विमानाची स्थिती सांगू शकेल.

एका अधिकाऱ्याचं म्हणणं आहे, "आतापर्यंत कुठलाच संकेत मिळालेला नाही. स्वाभाविकच अत्याधुनिक आणि अधिक प्रभावी ELTची मदत झाली असती."

अपग्रेडेशनमध्ये झाला विलंब

या विमानाच्या खरेदी कराराची माहिती असणाऱ्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं होतं, "विमानाला बदलावं की ते अपग्रेड करावं, यावर दशकभर खल झाला. त्यानंतर आम्ही या निष्कर्षावर पोचलो की विमान अपग्रेड करायला हवं. युक्रेनच्या एंटोनोव्ह कंपनीने हवाई दलासाठी या विमानाची निर्मिती केली होती. या कंपनीनेदेखील अपग्रेडेशनसाठी प्रस्ताव दिला होता. त्यातल्या अटीही चांगल्या होत्या."

विमानाचं वय बघता त्याच्या पंखांमध्ये अपग्रेडेशन व्हावं. विमानाची वयोमर्यादा 25 ते 40 वर्षांनी वाढवण्यासाठी त्यात आधुनिक उपकरणं लावावी, अशी हवाई दलाची इच्छा होती.

मात्र, 2014 च्या सुरुवातीला अचानक एक वाद निर्माण झाला. रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष पेटला. या युद्धाचा अनेक गोष्टींवर परिणाम झाला. AN32चं अपग्रेडेशनही त्यापैकीच एक आहे.

हवाई दलाच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितलं, "योजनेनुसार काही AN32 युक्रेनमध्ये अपग्रेड झाले. आम्ही कानपूरमधल्या HAL मध्ये किट्स येण्याची वाट बघत होतो. मात्र, त्यात विलंब झाला. आम्ही सगळीकडून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, योजनेनुसार अपग्रेडेशन होऊ शकलं नाही."

हवाई दलाचं म्हणणं आहे की, AN32च्या अपग्रेडशनची आशा अजून पूर्णपणे मावळलेली नाही. हे मात्र खरं की त्यात विलंब झालाय.

AN32 हूनही जुन्या हॉकर सिडले (HS) एव्हरो 748 या विमानावरही हवाई दलात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

सर्वप्रथम जून 1960 मध्ये HS एव्हरो उडवण्यात आलं आणि हे विमान उडवणं दिवसेंदिवस अवघड होत चालल्याचं अधिकारी सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)