आदित्य ठाकरेंना जेव्हा विचारलं गेलं 'स्पेशल' व्यक्तीकडून काही 'खास गिफ्ट' मिळालं का?

आदित्य ठाकरे Image copyright Facebook

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना अनेक शुभेच्छा आल्या. कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे पोस्टरही लावले. पण सर्वांना उत्सुकता होती की आदित्य ठाकरेंना सर्वांत खास काय गिफ्ट मिळालं? हे जाणून घेण्याची.

काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली याबाबत अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आली. त्या प्रश्नांची सफाईदारपणे उत्तरं देणारे आदित्य ठाकरे एका प्रश्नाने काहीसे गोंधळून गेले.

आदित्यजी तुम्हाला एखाद्या स्पेशल व्यक्तीकडून काही स्पेशल गिफ्ट मिळालं आहे का असा प्रश्न पत्रकाराने विचारताच आदित्य ठाकरे हसले. क्षणभराचा पॉज घेऊन ते म्हणाले. तुम्ही सगळे लोक आला आहात ना?

या अनपेक्षित प्रश्नाने आणि त्यांच्या उत्तराने परिषदेत हशा पिकला. पुन्हा सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळल्या आहेत असं पाहता आदित्य ठाकरेंनी दोन्ही हात जोडले आणि पुन्हा हसले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे हे बॉलीवुड अभिनेत्री दिशा पटनीसोबत दिसले होतं. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. काही लोकांनी दिशाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली होती की दोन मित्र बाहेर जेवणासाठी जाऊ शकत नाहीत का? मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करत नाही. मला मैत्रिणी आहेत तसेच मित्र देखील आहेत.

विधानसभेत जाणार का?

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले होते की आदित्य ठाकरे हे चांगले मुख्यमंत्री होऊ शकतील. याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, सध्या माझ्या कामाचा फोकस वेगळा आहे. सध्या माझ्यासमोर दहावी बोर्डच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणं हा प्रश्न आहे. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी राऊत यांच्या वक्तव्यावर भाष्य करायचं टाळलं होतं.

Image copyright Aditya thackery/facebook

सर्व कार्यकर्त्यांची आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की तुम्ही विधानसभेत जावं. तर तुम्ही विधानसभेत जाणार का? असाही प्रश्न त्यांना विचारला.

या प्रश्नाला उत्तर देताना ते लगेच म्हणाले मी दर सेशनला विधानसभेत जातो आणि मला जी निवेदनं मुख्यमंत्र्यांना द्यायची आहेत ती देतो.

मग बोलले कशावर?

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, SSCच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण मिळावेत. जेणेकरून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश घेणं सोपं जाईल.

काल रात्री साडे अकरा वाजेपर्यंत माझी आणि मुख्यमंत्र्यांची SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांबाबत चर्चा झाली. CBSE आणि ICSEच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत इंटरनल चे गुण जोडले जातात त्यामुळे त्यांची टक्केवारी वाढते पण SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे गुण मात्र जोडले जात नाहीत. त्यामुळे त्यांची टक्केवारी कमी होते. या प्रश्नावरच आमची चर्चा झाली असा खुलासा आदित्य ठाकरेंनी केला.

या प्रश्नाव्यतिरिक्त दुष्काळावर चर्चा झाल्याचंही ते म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री आणि मी, आम्ही दहावीचे पेपर कसे दिले होते यावरही गप्पा मारल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)